Saturday, 24 October 2015

सल

आज परत तिची पोस्ट वाचली.
मी तिला ओळखत  नाही. पण तिनी काढलेली चित्र आणि तिच्या फेसबुकच्या पोस्ट वाचून का कोण जाणे तिला अ‍ॅड करावंसं वाटलं.
पुन्हा एकदा त्याच भळभळत्या जखमेविषयीची पोस्ट. तोच सल. इतका काळ लोटला तरी मनात ताजा असणारा.
का सोडून गेला असेल तो तिला? किंवा का वेगळे रस्ते निवडले असतील दोघांनी? तिला जशी त्याची आठवण येते तितकीच उत्कटतेनी त्याला येत असेल तिची आठवण? असे अनेक प्रश्न डोक्यात येत राहतात.
ब-याचदा तिच्या पोस्ट्स खूप जास्त पर्सनल असतात. पहिल्या पहिल्यांदा वाचून असं वाटलं की इतक्या नाजूक आणि हळव्या गोष्टी फेसबुकवर का टाकाव्यात? पण मग मलाच कळलं की मला त्या वाचून कुठेतरी स्वतःला मोकळं वाटत होतं. रिलेट होत होतं. असं अनेक जणांना होत असणार.
पण आज मी जेव्हा तिनी लिहिलेलं वाचते तेव्हा ते ज्या मला आपलं वाटतं, जवळचं वाटतं, त्या माझ्यापासून आता मीच दूर गेलीये. म्हणजे मला ते खूप जवळचं वाटतं पण त्या वाटण्यापासून मी मात्र लांब असते. लांबूनच त्या वाटण्याकडे बघत असते.
एके काळी मी पण अशी आकंठ प्रेमात बुडाले होते. मला त्याच्याशिवाय जगताच येणार नाही असं मला वाटत होतं. तसं मीच ठरवून पण टाकलं होतं. पण असं झालं नाही. जसा जसा काळ लोटला तसं मला समजत गेलं की सगळेच जण स्वतःच्या टर्म्स सांभाळतंच जगत असतात. अगदी प्रत्येक जण स्वतःच्या टर्म्स आधी पुढे ठेवतो. मग मी पण ठरवलं की मी पण माझ्या टर्म्स वरच खेळणार.
म्हणजे माझ्यासाठी प्रेम हे कधी काळी खूप उत्कट, भव्य दिव्य उदात्त असं काहीतरी होतं. मग नंतर कळत गेलं की सगळा पुष्कळदा व्यवहारच असतो. मग या व्यवहारी जगाची रीत समजून घेता घेता माझ्या पण भावनांची धार हळू हळू बोथट होत गेली. म्हणजे एखादा गुन्हेगार कसा विचार करत असेल हे शोधत जाताना स्वतःचं डोकं नको असतानाही तसंच काहीसं चालायला लागलं तर कसं वाटेल? तसं काहीसं. मी इतकी बदलले की मी आज स्वतःलाच अनोळखी वाटते. कधी कधी तर स्वतःचीच भीती पण वाटते. असं वाटतं तो भाबडेपणा यावा परत. पण काळाचं चक्र असं पाहिजे तसा फिरवता थोडंच येतं?
आहे ते स्वीकारावंच लागतं.
आणि माझ्या बाबतीत तर उलटंच झालं. म्हणजे झालं ते खरोखर चांगलं झालं. पण त्यामुळे आता मला स्वतःच्या निवडीवर पण तितकासा भरोसा राहिला नाही. So I am least bothered now. आणि मी एवढंच ठरवलंय की मी कोणालाच इतकं महत्वाचं नाही होऊ देणार माझ्यासाठी की तो नसला तर मी कोसळून पडीन.