Saturday, 10 December 2011

आबा


एका मित्रानी परवा ‘तोच चंद्रमा’ गाणं पाठवलं ईमेल वर.... आणि एकदम आबांची आठवण झाली. हे आबांचं आवडतं गाणं. आबा म्हणजे बाबांचे बाबा.
ते गायचे पण छान. त्यांचा आवाज खूप छान होता. पण त्यांना गाणं शिकायची वगैरे संधी नाही मिळाली.
पण ते सदानकदा गात असायचे. त्यांची आवडती गाणी म्हणजे हे- तोच चंद्रमा, झुंजूमुंजू झालं, वाटव्यांचं वारा फोफावला, एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात..... मला एवढी आठवतात... जी ते गात राहायचे.
त्यांचा आवाज सगळ्यात चांगला लागायचा तो म्हणजे बाथरूम मधे!! थंड पाण्यानी अंघोळ करायचे. मग हुडहुडी भरायची.... मग काय.... तानांवर ताना.... ते अंघोळ करताना दरवाजा लावयचे नाहीत. चट्टेरी पट्टेरी, नाडी असलेली मोठ्ठी चड्डी घातलेले आणि मोठ्यांदा गाणारे आबा.... हे चित्र मनावर कायमचं कोरंलेलं आहे. तेव्हा आमच्याकडे स्टीलचा तांब्या असायचा बादलीतून अंगावर पाणी घ्यायला.
त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी खूपच आठवतात. मी साधारण पाचवी-सहावी मधे असेन तेव्हा. 
त्यांना दुपारी साधारण 3-4 वाजता भूक लागायची. मग ते स्वयपाकघरात डब्बे उचकत बसायचे. आणि मग बर्‍याचदा शेंगदाणे मुठीत घेऊन खात बसायचे. मला खूप मजा वाटायची...
त्यांना पेपर मोठ्यानी वाचायची सवय होती. आणि पेपरातलं वाक्य तर सुरू नीट व्हायचं पण नंतर ते अम्म्म्म्म्......आणि शेवटी फक्त अssssssss एवढंच उरायचं.
ते पहाटे पहाटे पासून गायला लागायचे. त्यांचं पहाटेचं नेहमीचं गाणं म्हणजे-
झुंजू मुंजू झालं, चकाकलं समदं रान, पिगुन शान सोन्यावानी, हरपलं भान
मला या गाण्याचा आगापिछा काहीही माहित नाही. गूगल ला विचारायला हवंय.
आम्ही रिक्षात बसून कुठे चाललो असलो आणि बाजूनी ट्रक, किंवा बस किंवा तत्सम काही वाहन गेलं की आबा गडबडीनी आमची तोंडं दुसर्‍या दिशेला वळवायचे. त्या गाड्यांचा धूर नाकात जाऊ नाही म्हणून.
त्यांना उगीच जाऊन गळ्यात पडलं किंवा पाप्या घेतल्या की भयंकर राग यायचा. मग मी अनघा आणि मितू मुद्दाम त्यांच्या गळ्याला लटकायचो. ते आम्हाला काही बोलायचे नाहीत. पण त्यांची स्वगत बडबड सुरू व्हायची... काय सारखे मुके घेत बसतात....
आबांचा बेड म्हणजे विशेष जागा होती. आज्जी आणि आबांचे बेड्स एकाच रूम मधे समोरासमोरच्या भिंतींना लागून होते. आजीचा बेड एकदम स्वच्छ!! चादरीवर एकही सुरकुती नाही. आणि आबांचा बेड म्हणजे खूप सारा पसारा. आणि जरा गादी पायाच्या बाजूनी वर उचलली की भला मोठा खजीना!! कसली कसली कात्रणं....सुताचे गुंडे....कसली कसली बिलं....सेफ्टी पिना.....काय आणि काय....
त्यांनी अनेक चांगल्या लेखमाला किंवा क्रमशः येणार्‍या लहान मुलांच्या गोष्टींची सीरीजमधे कात्रणं कापून नीट जपून ठेवलेली होती....
ते वाण्याकडून आलेल्या पुड्यांचा दोरा नीट गुंडाळून त्याचा मोठ्ठा गुंडा करून ठेवायचे...तो क्रिकेटच्या बॉलपेक्षा मोठा असायचा.
आम्ही आबांबरोबर फुग्याची उडवाउडवी खेळायचो. म्हणजे ते त्यांच्या बेडवरून दोन्ही हात वापरून फुगा आमच्याकडे उडवायचे आणि आम्ही सगळ्या रूम भर उड्या मारत तो परत त्यांच्याकडे उडवायचो.
आबांचे वडील आजारी होते तेव्हा आबा मुंबईला ग्रॅंट रोडला नोकरी करायचे. त्यांच्या बाबांनी शेवटच्या दिवसात त्यांना परत पिंपळगावला बोलवलं. तेव्हा आबा नोकरी सोडून आले. आणि सगळी आर्थिक घडी विस्कटली. ती मग बाबा, आक्काई, माधु आत्या सगळे मोठे होइपर्यंत नीट बसलीच नाही. पण आज्जी खंबीर होती. तिनी शाळेत शिक्षिकेची नोकरी करत सगळ्यांना शिकवलं. त्यामुळे आमच्या घरात आज्जीच डिसिजन मेकर होती.
आबांना बाबा वगैरे सगळे दादा म्हणायचे आणि आज्जीला ताई. आबा आजीला ताईसाहेब म्हणून हाक मारयचे. किंवा ‘अगं ए’.... पण नाव घेऊन कधीच नाही.
त्या दोघांचे संवाद विशेष ऐकण्यासारखे असायचे. आज्जी ठार बहिरी. एकदा मी त्या दोघांच्या बेडच्या मधे गादी घालून झोपले होते. आबांनी आज्जीला विचारलं गॅस नोंदवला का?, त्यावर आज्जीचं उत्तर- व्याज? कसलं व्याज??
माझ्यासाठी हार्मोनियम घेतली तेव्हा आबाच कसले खूष झाले होते. मग बरेच दिवस मला वेगवेगळे सूर दाबायला सांगून त्यांची पट्टी शोधायचा प्रयत्न केला होता. आबांनी विचारलं की काय गं, पांढरी दोन वाटतीये का? की मी लगेच हो हो, पांढरी दोनच वाटतेय. पांढरी काय आणि दोन काय. कोणालां कळत होतं?? पण आम्ही दोघं ती पेटी घेऊन बळंच आ-ऊ-टा-टू करत बसायचो.
तेव्हा- म्हणजे back in 80s आबांनी स्वतःचा स्वतः होमिओपथीचा अभ्यास केला होता. त्यांच्या कपाटात खूप सारी औषधं पण होती. महात्मा नगरमधले बरेच जण औषधासाठी यायचे आबांकडे. आबांनी लोकांचे टॉंसिल्स बरे केले, त्यांची ऑपरेशंस टळली असं काय काय आम्हाला ऐकायला मिळायचं. आमच्या आजारपणात पण हमखास आबांचंच औषध.
मला आणि अनघाला घ्यायला रिक्षा यायची. मी कायम उशीर करणार. मग आबांचं बीपी वाढणार. शेवटी उजूआत्या आमच्या शाळेच्या वेळात त्यांना गणपती मंदिरात नाहीतर वाचनालयात पाठवून द्यायची.
त्यांना विशेष मित्र असे नव्हतेच. पण शेवटी शेवटी मात्र त्यांचा जेष्ठ नागरिक मंडळाचा मोठा ग्रुप जमला होता. ते सगळे जण प्रत्येकाच्या वाढदिवशी त्या त्या माणसाकडे गुलाबाचं फूल घेऊन जायचे. आबांच्या शेवटच्या वाढदिवशी आमच्याकडे पण आले होते. आबांनी ‘एकवार पंखावरूनी, फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे, तुझ्या अंगणात’ म्हटलं होतं. ते मी ऐकलेलं आबांचं शेवटचं गाणं.
त्यानंतर थोडे दिवसात आज़्जी गेली. आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी आबा पण. हार्ट ऍटॅक आला त्यांना. आज्जीचं जाणं बहूदा सहन करू शकले नाहीत. पण एका परीनं बरं झालं. त्यांना एकटं जगायला अवघड गेलं असतं फारच.
त्यानंतर आम्हाला खूपच अवघड गेलं सगळ्यांना. रोजची सवय असलेले आज्जी आबा नाहीतच एकदम... 
आबा असे bits and pieces मधे आठवत राहतात. कदाचित आबांचं व्यक्तिमत्वाचं पहिलं impression जरा messy असं होत असेल. पण he was such a gem... 
कशी मजा असते ना. ह्या सगळ्या आणि अजून अनेक आठवणी या डोक्याच्या खोक्यात बंद आहेत. एका गाण्याच्या निमित्तानी उसळी मारून वर आल्या. एरवी कुठल्या तरी कोपर्‍यात पडून असतील....

No comments:

Post a Comment