नेमेची गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. Whatsapp वर एकेक सुगरण मैत्रीणींनी केलेल्या मोदकांचे photos येताहेत. त्यांची कौतुकं चालू आहेत..... recipes share करणं चालू आहे (हो whatsapp वर!)
आणि नेहमीप्रमाणेच मी हिरमुसून बसली आहे.
आमच्या घरी गणपती बसत नाही. हे माझं फार लहानपणापासूनचं दु:ख आहे. आणि यावरून मी आई बाबांचं अजून सुद्धा डोकं खाते. आमचा गणपती family tree मधे कुठेतरी हरवला आहे. म्हणे गणपती मोठ्या मुलाकडे बसवण्याची पद्धत आहे. आणि माझे पणजोबा किंवा खापरपणजोबा बहूदा छोटे भाऊ असावेत. म्हणून आमचा गणपती कालौघात हरवला. अजूनही त्याचा माग ठरवला तर काढता येईल. पण ते घर किती अनोळखी असेल. मग तिथला गणपती तरी ओळखीचा, आपला, माझा कसा वाटणार?
घरी गणपती बसवावा म्हणून लहानपणी मी अनेकदा रडून गोंधळ घातलेला मला चांगला आठवतो. पण आई बाबांनी कधीही हो म्हटलं नाही. म्हणे असा मधेच आपल्या मनाला वाटेल तसा गणपती बसवायला सुरू करता येत नाही. पण मी असे अनेक लोक बघितलेत की ज्यांनी स्वतःहून परंपरा वगैरे नसताना गणपती आणायला सुरुवात केली. त्यातलीच एक माझी आत्या. नाशिकलाच राहणारी. मग गणपतीत मी अनघा आणि मितालीचा मुक्काम आत्याकडे असायचा. दादा म्हणजे माझा आतेभाऊ कमालीचा artist. मग त्याच्याबरोबर (खरं म्हणजे त्याच्या मधे मधे करत) आम्ही पण आरास करायला मदत करायचो. thermocol कापून दे, कागदंच चिटकव, चमकीच लाव, वायरच तोडून दे हे असं सगळं आम्ही अगदी उत्साहात करायचो. एकीकडे आत्याची स्वयंपाकाची गडबड असायची. पंचामृत, mix भाजी, उकडीचे मोदक असं सगळंच. गणपती बसवून नंतर घरी यायला नको वाटायचं. उदास उदास वाटायचं. मग आई बाबांशी भांडण... पण आपल्याकडे गणपती का नाही?????
जसा आत्याकडचा गणपती हा त्यातल्या त्यात solace होता तसंच आणखी एक गोष्टीमुळे हे दुःख विसरायला व्हायचं. ते म्हणजे आमच्या महात्मानगरचं गणपती मंदीर. महात्मा नगर हे एक अतिशय planned neighbourhood होतं. साधारण तीनेक square km चा area असेल. व्यवस्थीत काटकोनात रस्ते, आखीव रेखीव आयताकृती बंगले किंवा buildings साठी plots आणि बरोबर मध्यभागी खेळायला भलं मोठं ground. त्याच्याच बजूला गणपतीचं मंदीर आणि एक घसरगुंडी झोके सी-सॉ इ. असलेली बाग आणि त्याच्या बाजूला वाचनालय. आम्ही १९८७ ला रहायला गेलो तेव्हा हे सगळं नुकतंच वसत होतं. मी तेव्हा ३ वर्षाची होते. हळूहळू जसं महात्मानगर occupy व्हायला लागलं तसं माझ्या वयाची, माझ्याहून मोठी, छोटी अशी अनेक वयोगटांची लहान मुलं आमच्या आजूबाजूला राहायला आली. आमचा सगळ्यांचा शाळेव्यतिरिक्तचा बहुतांश वेळ ground-बाग- मंदीर यापैकी एके ठिकाणी जायचा.
गणपतीच्या १० दिवसात हे मंदीर विशेष गजबजून जायचं. तशी एरवी पण तिथे भजन म्हणणा-या आजीबाईंची गर्दी असायची, अनेक आजोबा निवांत बसलेले असायचे, दर्शनाला आलेले लोक टेकलेले असायचे.
पण गणपतीत मंदीर दिव्याच्या झगमगाटानी उजळून जायचं. मोठ्यानी गाणी लावलेली असायची. सा-रे-ग-म-प म-प-ध-नी-सा, गणराज रंगी नाचतो नाचतो, ओमकार स्वरूपा, अशी चिक मोत्याची माळ... दर वर्षी हीच सगळी गाणी. आमच्या घरातून हे सगळं दिसायचं. त्या गाण्यांची, दिव्यांची सोबत वाटायची, सवयच होऊन जायची दहा दिवसात.
माहात्मा नगरमधली सगळी मोठी मुलं committees form करून कसल्या कसल्या स्पर्धा ठेवायची. चित्रकला, fancy dress, नाच, गाणी, हस्ताक्षर, पाककला अशा नाना स्पर्धा.या स्पर्धांचं आणि त्यातल्या बक्षिसांचं कोण अप्रूप. त्यात एक दिवस fun fair असायचं बागेत, म्हणजे सगळे महात्मा नगरमधे लोक वेगवेगळे stalls लावायचे. बायका खाण्याचे, मुलं खेळांचे, कोणी कसले कोणी कसले. त्यात सगळ्या महात्मानगरची चिट्टी पिट्टी अगदी उत्साहानी भाग घ्यायची. सातवीत असताना एकदा मी आणि मितूनी पण एक stall लावलेला. ’kill the rat' नावाच्या खेळाचा. खेळ असा होता- एका teapoy सारख्या table वर आम्ही badminton ची shuttlecocks ठेवायची ची रिकामी नळी आम्ही तिरकी धरणार. आमचा एक हात त्या नळीत असणार. त्या आतल्या हातात एक ping-pong चा ball. आणि ज्याला खेळ खेळायचा आहे त्याच्या हातात लाटणं घेऊन तो समोर उभा. मग आम्ही kill the rat- kill the rat म्हणत कधीही तो ball त्या नळीतून सोडणार आणि समोरच्यानी त्याला लाटण्यानी बरोबर नेम धरून मारायचं. खेळ खेळायचे २ रुपये आणि जिंकलं तर milky bar बक्षिस. हा खेळ वाचायला जरी सो्पा असला तरी खेळायला नाही हो! hardly कोणाला त्या ball ला बरोबर मारता आलं असेल. आम्हाला किती फायदा झाला त्या दिवशी!!
गणपतीचे १० दिवस कसे जायचे कळायचं पण नाही. अनंत चतूर्दशी नंतर मंदीर पण सूनं सूनं वाटायचं. माझं काय म्हणणं असायचं की तुम्ही भले गणपती विसर्जन करून या पण मंदिरात ती गाणी तर चालू ठेवा! म्हणजे मग जरा तरी बरं वाटेल. पण तेव्हा ३-४ फूट उंची असलेल्या अस्मादिकांचे ऐकतो कोण?
दरवर्षी गणपती आले की हटकून महात्मानगरची आठवण येते आणि nostalgic व्हायला होतं.
पण पुण्यात पण गणपतीची कमी मजा नसते. ब-याच जणांना गणपतीचं इथलं जे प्रस्थ आहे त्याचा राग येतो. पण मला मात्र हे वातावरण जाम आवडतं. जशी दिवाळी ’in-air' असते तसे पुण्यात गणपती ’in-air' असतात. देखावे उभारणं, मग ते बघायसाठी लोकांची झुंबड, मोठ्यांदा लावलेली गाणी, traffic चा सावळा गोंधळ... सगळंच अवघड. आणि या सगळ्याचा crescendo म्हणजे विसर्जनाची मिरवणूक. कोणी काही म्हणो, ही मिरवणूक (त्यात द्दारू पिऊन नाचणारं public सोडल्यास) आणि त्यातले ढोल पथकांचे performances हा माझा अत्यंत आवडता प्रकार आहे. दर वर्षी न चुकता कोणा ना कोणाला पकडून मिरवणूक बघायला घेऊन जायचं बरोबर.
पण अर्थातच हे घरच्या गणपतीला compensation असूच शकत नाही. घरी गणपती बसण्याची मजाच वेगळी आहे. १० दिवस बाप्पाची कशी सोबत होऊन जाते. आणि मग विसर्जनानंतर ती जागा रिकामी रिकामी वाटत राहते. मग वाट पाहणं सुरू होतं पुढच्या वर्षीच्या गणेश चतूर्थीची....