कधी एकदा
अनंत अथांग आकाशाखाली
उत्तर दक्षिण गिरकी घेउन
वाहत भरारा म्हणाला वारा:
जीर्ण विचारांची, जीर्ण संकेतांची
वाहून नेऊन सुकली पाने
निर्मळ मोकळी करितो राने
तोच खळाळत, धुंद उसळत
नदी धावली आणि म्हणाली:
लोकमाता मी
लोकसेवेचे माझे हे व्रत
जाते मी वाहत आणि फुलवित
काठाकाठांनी
दोन्ही हातांनी
फुलांची, फळांची समृद्ध सृष्टी
स्पर्शात माझिया अमृतवृष्टी
तोच कडाडत, गर्जत गर्जत
वदली त्वेषात जळत विद्युत-
मूर्तिभंजक मी जागृत तमी
करून प्रहार
भेदिते अंधार
माझीच शक्ती
देतसे मुक्ती
जीर्ण आकारांस! जीर्ण प्रतिमांस!
बाजूस कोठे लपून होते
हिरव्या तृणात फूल इवले
उभे एकले!
वनपरीचे स्वप्नच जणू तिच्या नकळत मागे राहिले
आणि उमलले!
इंद्रधनुष्यच अथवा लाजरे
भूमीला स्फुरले!
रंगांच्या कोवळ्या जाहल्या पाकळ्या!
ऐकून नदीचे वायूचे शब्द
निश्चल निःशब्द फूल इवले
उभे राहिले!
तयास वाटले काही बोलावे
हृद्गत आपुले सांगावे
अधीर लाज-या अधरांमधून
फुटेना शब्द,
फूल इवले शांत निःशब्द!
तयाचे हृद्गत ऐकण्यासाठी
थांबला जरा खट्याळ वारा
थांबली बिजली, नदीही थांबली
आतुर दिशाही जाहल्या दाही!
थरथरल्या तोच पाकळ्या
साठविलेले सारे मनातले
उचंबळले
अनंत अथांग आकाशाखाली
गंधित मौनास इवल्या फुलाच्या
फुटला अंकूर कोवळ्या स्वराचा
सारे साठवून
सारे आठवून फूल म्हणाले
"उमलते मी........उमलते मी."
-मंगेश पाडगावकर
अनंत अथांग आकाशाखाली
उत्तर दक्षिण गिरकी घेउन
वाहत भरारा म्हणाला वारा:
जीर्ण विचारांची, जीर्ण संकेतांची
वाहून नेऊन सुकली पाने
निर्मळ मोकळी करितो राने
तोच खळाळत, धुंद उसळत
नदी धावली आणि म्हणाली:
लोकमाता मी
लोकसेवेचे माझे हे व्रत
जाते मी वाहत आणि फुलवित
काठाकाठांनी
दोन्ही हातांनी
फुलांची, फळांची समृद्ध सृष्टी
स्पर्शात माझिया अमृतवृष्टी
तोच कडाडत, गर्जत गर्जत
वदली त्वेषात जळत विद्युत-
मूर्तिभंजक मी जागृत तमी
करून प्रहार
भेदिते अंधार
माझीच शक्ती
देतसे मुक्ती
जीर्ण आकारांस! जीर्ण प्रतिमांस!
बाजूस कोठे लपून होते
हिरव्या तृणात फूल इवले
उभे एकले!
वनपरीचे स्वप्नच जणू तिच्या नकळत मागे राहिले
आणि उमलले!
इंद्रधनुष्यच अथवा लाजरे
भूमीला स्फुरले!
रंगांच्या कोवळ्या जाहल्या पाकळ्या!
ऐकून नदीचे वायूचे शब्द
निश्चल निःशब्द फूल इवले
उभे राहिले!
तयास वाटले काही बोलावे
हृद्गत आपुले सांगावे
अधीर लाज-या अधरांमधून
फुटेना शब्द,
फूल इवले शांत निःशब्द!
तयाचे हृद्गत ऐकण्यासाठी
थांबला जरा खट्याळ वारा
थांबली बिजली, नदीही थांबली
आतुर दिशाही जाहल्या दाही!
थरथरल्या तोच पाकळ्या
साठविलेले सारे मनातले
उचंबळले
अनंत अथांग आकाशाखाली
गंधित मौनास इवल्या फुलाच्या
फुटला अंकूर कोवळ्या स्वराचा
सारे साठवून
सारे आठवून फूल म्हणाले
"उमलते मी........उमलते मी."
-मंगेश पाडगावकर
No comments:
Post a Comment