Sunday, 25 December 2016

झाड, माणूस आणि कुंपण



स्वतःशीच गुणगुणत
आपल्याच नादात
तो चालला होता

आणि अचानक
पाडाला आलेल्या आंब्याचा दरवळ
कुठुनसा वार्‍याबरोबर आला

त्यानी मान वेळावून बघितलं
कुंपणापलिकडचं आंब्याचं झाड
त्याला खुणावत होतं

त्या पिकल्या आंब्याचा मोह
त्याला अनावर झाला
त्यानी आपसुक हात पुढे केला

झाडानंही अलगद आपलं फळ
त्याच्या हातात टाकलं

आणि इतक्यात

कुंपणापलिकडून त्या कुंपणाचा मालक
कुठुनसा अवतरला
त्या गुन्ह्याचा साक्षी म्हणून

आंब्याच्या झाडाभोवती
माणसाच्या मालकीची पुसटशी रेघ होती
आणि त्या रेघेवर होतं
एक काटेरी कुंपण

कुंपणाची रेषा खरं म्हणजे झाडानीच ओलांडली होती
पण मालकीच्या रेषेचं काय?
ती झाड कशी ओलांडणार?

आपल्या डोळे मिचकवत आंबा देऊ पाहणार्‍या
त्या झाडाचं म्हणणं ऐकायचं
की झाडावर हक्क सांगणार्‍या माणसाचं?
त्याला संभ्रम पडला

- अमृता

No comments:

Post a Comment