Saturday, 13 May 2017

ॠण

तुम्ही माझे शब्द चोरलेत
आणि दिलात त्यांना भगवा रंग
एक एक शब्द हेरलात
कुणाला गाफिल पकडलंत
तर कुणाला फूस लावलीत
साम, दाम, दंड, भेद
असं सगळं वापरून
तुम्ही माझे शब्द चोरलेत

आज दिसतात खरे ते टवटवीत
पण जरा तो भगवा वर्ख खरवडून बघितला
तर कळतं
जीव घुसमटून गेलाय त्यांचा
मरायला टेकलेत ते
कुजत चाललेत
भक्ती, संस्कृती, परंपरा, धर्म 
असे न जाणे किती शब्द

माझे शब्द असे नव्हते
त्यात आकाशीचा नितळपणा होता
सूर्याच्या पहिल्या किरणांचं कोवळेपण होतं
बहाव्याचा बहर होता
समुद्राचं गांभीर्य होतं
समस्त मानवजातीला
त्यातल्या चांगल्या-वाईटासह कवेत घेण्याची ताकद होती

या शब्दांचा हात पकडून मी मोठी झाले
या शब्दांनी माझ्यातला माणूस जागा केला
सहवेदना जागी केली
वास्तवाचं भान दिलं
समाजाशी, सृष्टीशी नातं समजवलं

आज हेच शब्द वापरून
तुम्ही माणसामाणसात फूट पाडताय
धरणीमातेचे गोडवे गात
तिला, तिच्या लेकरांना लुटताय
हे शब्द पडद्यावर ठेवून
मागे वेगळेच खेळ खेळताय

आज मला या शब्दांची भीती वाटते
कारण मी ते जरा उच्चारले
की तुम्ही मला तुमच्यात खेचणार
फरफटत
आणि फासणार मला पण तो भगवा रंग

पण म्हणून मी हरणार नाही
या शब्दांचं माझ्यावर ॠण आहे
ते मी चुकतं करणार
या शब्दांचा अर्थ माझ्यात जिवंत आहे
मी तो जिवंत ठेवणार

पुसीन मी तो भगवा रंग
फुंकर घालीन त्यांच्यावर
पुन्हा त्यांना जिवंत करीन
निदान तसा प्रयत्न करीन

पण हरणार नाही
नक्कीच नाही...

-अमृता


ज्या दादांनी मला देव समजवला, भक्ती समजवली, मनाचे, समाजाचे अनेक पदर उलगडून दाखवले, योग्य-अयोग्य याची जाण दिली, माझ्यातली मूल्य जागवली त्यांना ही कविता अर्पण.

No comments:

Post a Comment