Wednesday, 31 May 2017

हरवलेलं निर्माण


आज खूप दिवसांनी External Hard Disk मधला निर्माणचा folder उघडला. उगीचच. काही कारण नसताना. काही reference material बघायला HD उघडली. त्यात सागर आणि तन्मयनी मिळून तयार केलेला data नावाचा भला मोठा folder आहे. त्यांनी ती HD काही दिवस नेली होती वापरायला. परत देताना त्यात मी ज्या films बघितल्याच पाहिजेत असं त्या दोघांना वाटत होतं त्या त्यांनी copy करून दिल्या. साधारण ७०-८० films सहज असतील. त्यातच हा folder पण होता. निर्माणच्या दुसर्‍या बॅचच्या दुसर्‍या शिबिराची video recordings होती त्यात. मी या कॅम्पला येऊ शकले नव्हते. मला सुट्टी मिळाली नव्हती. मी तेव्हा मुंबईला EMC मधे काम करायचे. या कॅम्पचे किस्से मात्र मी भरभरून ऐकले होते. मुंबई विरुद्ध पुणे भांडण, शिबिरार्थींनी खाल्लेला ओरडा, भूक काय असते ते समजण्यासाठी त्यांना घडवलेला एक दिवसाचा उपास... अशा अनेक गोष्टींची रसभरीत वर्णनं नंतर किती महिने... वर्ष ऐकली.
तर या कॅम्पच्या सेशन्सचं रेकॉर्डिंग असलेला तो फोल्डर. त्यात कुमार केतकर, गिरीष सोहोनी, सुरेश सावंत अशा अनेक जणांची सेशन्स होती. आणखी एक video clip होती. त्यात पीडी हातात माईक घेऊन गातानाचं चित्र दिसत होतं. आणि file चं नाव होतं ’नायना lecture’. पीडीचं गाणं आजकाल ऐकायला मिळणं दुर्मीळच झालंय. सगळे पुर्वीसारखे सतत भेटत पण नाहीत. तर त्याचं गाणं ऐकावं म्हणून आणि नंतर नायनांचं lecture ऐकावं असा विचार करून ती file play केली. पिंपळचा हॉल, तिथल्या ओळखीच्या जाडसर सतरंज्या, त्यावर हातात माईक घेऊन धीरगंभीर मुद्रेनी बसलेला पीडी, मागे तंबोरा. आम्हाला सगळ्यांना निर्माणच्या शिबिरांना काही क्षणचित्रांमधे वर्णन करायला किंवा बद्ध करायला सांगितलं तर त्यातलं हे एक चित्र. गाणारा पीडी. त्याच्या स्वतःपेक्षाही त्याचा आवाज आणि गाणं हेच त्या शिबिराचा भाग जास्त होतं... किंबहुना अविभाज्य भाग होता.
’दर्द से मेरा दामन भर दे या अल्ला’... ते ऐकलं मात्र...आणि आमच्या कॅम्प्सची इतकी प्रकर्षानी आठवण आली. It was a different world altogether. तिथे त्या पिंपळ मधे, तिथे बसलेल्या आमच्यामधे, आमच्याशी संवाद साधायला येणार्‍या प्रत्येक वक्त्यामधे, नायनांमधे.... सगळ्यामधे काहीतरी होतं... एक भारलेपण... एक ऊर्जा... एक विश्वास... एक उमेद...अनेको स्वप्नं... असं सगळ्याचं मिश्रण... अजब मिश्रण....
तेव्हा आम्ही सगळे बरेचसे कच्चे... थोडे भोळसट.... आणि may be जास्त pure…
दिवसभराची सेशन्स, चर्चा, दिवस संपल्यावर गप्पा... एका ताटात दोन-दोन तीन-तीन जणांनी जेवणं... डिसेंबरची थंडी... शोधग्रामचा परिसर (सर्च) ... तिथली झाडं.. चौक...गेटपर्यंतचा आणि बाहेरचा रस्ता... दंतेश्वरीचं मंदिर... जरा रस्ता संपून मेन-रोडवर आलो की दिसणारं आकाशातलं टिपूर... त्या रस्त्यावर जथ्याजथ्यानी गप्पा मारत चालणारे किंवा रस्त्यातच फतकल मारूनग बसलेले आम्ही सगळे... हसणं-खिदळणं...या सगळ्या गोष्टी मी कधीच विसरणार नाही... कधीच नाही...
आमच्यातले बरेच जण घडले त्या वातावरणात.. बाकीच्यांचं मला माहित नाही...पण मला दिशा मिळाली, नवी उमेद मिळाली, आपण चालतोय तो रस्ता बरोबर आहे हा  विश्वास मिळाला...
खरं तर मी नंतर कित्येकदा सर्चला गेले. पण नजर कायम ओळखीच्या लोकांना शोधायची. आणि कोणीच तिथे नसायचं. सगळेच वेगवेगळ्या वाटांना निघून गेलेले.ओळखू सुद्धा येणार नाहीत इतके बदललेले. तिथे रेंगाळणार्‍या फक्त त्यांच्या आठवणी.
मग हिरमोड व्हायचा. तो चौक, ती झाडं, ते रस्ते सगळं अचानक परकं वाटायचं. आणि निर्माणच्या कॅम्प्सची इतकी जास्त आठवण यायची. असं वाटायचं आत्ताच्या आत्ता सगळे इथे हवेत. परत. आधी सारखे. तितकेच स्वप्नाळू, तितकेच भारावलेले, तितकेच उत्साही...
धन्या, पवन, पीडी, मुक्ता, सागर, सजल, शास्त्री, अमित, संतोष, सचिन, वैभव, सोनू, अश्विनी, नंदाकाका, दत्ता मामा, दीपा ताई, उमेश भाऊ, सनत, सायली,.... किती नावं लिहू...
यातलं कोणीच असं हातातून सुटून वगैरे गेलेलं नाही, सगळे अजूनही भेटतात... गप्पा होतात... जशी वर्ष गेली तशी मैत्रीची वीण घट्टच होत गेली. आणि तरीही त्या कॅम्प्समधे, त्या जागेत, पिंपळमधे आणि तिथे असलेल्या आमच्यात जे होतं ते हातातून सुटत चाललंय. कणाकणानी.

Saturday, 13 May 2017

ॠण

तुम्ही माझे शब्द चोरलेत
आणि दिलात त्यांना भगवा रंग
एक एक शब्द हेरलात
कुणाला गाफिल पकडलंत
तर कुणाला फूस लावलीत
साम, दाम, दंड, भेद
असं सगळं वापरून
तुम्ही माझे शब्द चोरलेत

आज दिसतात खरे ते टवटवीत
पण जरा तो भगवा वर्ख खरवडून बघितला
तर कळतं
जीव घुसमटून गेलाय त्यांचा
मरायला टेकलेत ते
कुजत चाललेत
भक्ती, संस्कृती, परंपरा, धर्म 
असे न जाणे किती शब्द

माझे शब्द असे नव्हते
त्यात आकाशीचा नितळपणा होता
सूर्याच्या पहिल्या किरणांचं कोवळेपण होतं
बहाव्याचा बहर होता
समुद्राचं गांभीर्य होतं
समस्त मानवजातीला
त्यातल्या चांगल्या-वाईटासह कवेत घेण्याची ताकद होती

या शब्दांचा हात पकडून मी मोठी झाले
या शब्दांनी माझ्यातला माणूस जागा केला
सहवेदना जागी केली
वास्तवाचं भान दिलं
समाजाशी, सृष्टीशी नातं समजवलं

आज हेच शब्द वापरून
तुम्ही माणसामाणसात फूट पाडताय
धरणीमातेचे गोडवे गात
तिला, तिच्या लेकरांना लुटताय
हे शब्द पडद्यावर ठेवून
मागे वेगळेच खेळ खेळताय

आज मला या शब्दांची भीती वाटते
कारण मी ते जरा उच्चारले
की तुम्ही मला तुमच्यात खेचणार
फरफटत
आणि फासणार मला पण तो भगवा रंग

पण म्हणून मी हरणार नाही
या शब्दांचं माझ्यावर ॠण आहे
ते मी चुकतं करणार
या शब्दांचा अर्थ माझ्यात जिवंत आहे
मी तो जिवंत ठेवणार

पुसीन मी तो भगवा रंग
फुंकर घालीन त्यांच्यावर
पुन्हा त्यांना जिवंत करीन
निदान तसा प्रयत्न करीन

पण हरणार नाही
नक्कीच नाही...

-अमृता


ज्या दादांनी मला देव समजवला, भक्ती समजवली, मनाचे, समाजाचे अनेक पदर उलगडून दाखवले, योग्य-अयोग्य याची जाण दिली, माझ्यातली मूल्य जागवली त्यांना ही कविता अर्पण.