Showing posts with label माझ्या कविता. Show all posts
Showing posts with label माझ्या कविता. Show all posts

Saturday, 13 May 2017

ॠण

तुम्ही माझे शब्द चोरलेत
आणि दिलात त्यांना भगवा रंग
एक एक शब्द हेरलात
कुणाला गाफिल पकडलंत
तर कुणाला फूस लावलीत
साम, दाम, दंड, भेद
असं सगळं वापरून
तुम्ही माझे शब्द चोरलेत

आज दिसतात खरे ते टवटवीत
पण जरा तो भगवा वर्ख खरवडून बघितला
तर कळतं
जीव घुसमटून गेलाय त्यांचा
मरायला टेकलेत ते
कुजत चाललेत
भक्ती, संस्कृती, परंपरा, धर्म 
असे न जाणे किती शब्द

माझे शब्द असे नव्हते
त्यात आकाशीचा नितळपणा होता
सूर्याच्या पहिल्या किरणांचं कोवळेपण होतं
बहाव्याचा बहर होता
समुद्राचं गांभीर्य होतं
समस्त मानवजातीला
त्यातल्या चांगल्या-वाईटासह कवेत घेण्याची ताकद होती

या शब्दांचा हात पकडून मी मोठी झाले
या शब्दांनी माझ्यातला माणूस जागा केला
सहवेदना जागी केली
वास्तवाचं भान दिलं
समाजाशी, सृष्टीशी नातं समजवलं

आज हेच शब्द वापरून
तुम्ही माणसामाणसात फूट पाडताय
धरणीमातेचे गोडवे गात
तिला, तिच्या लेकरांना लुटताय
हे शब्द पडद्यावर ठेवून
मागे वेगळेच खेळ खेळताय

आज मला या शब्दांची भीती वाटते
कारण मी ते जरा उच्चारले
की तुम्ही मला तुमच्यात खेचणार
फरफटत
आणि फासणार मला पण तो भगवा रंग

पण म्हणून मी हरणार नाही
या शब्दांचं माझ्यावर ॠण आहे
ते मी चुकतं करणार
या शब्दांचा अर्थ माझ्यात जिवंत आहे
मी तो जिवंत ठेवणार

पुसीन मी तो भगवा रंग
फुंकर घालीन त्यांच्यावर
पुन्हा त्यांना जिवंत करीन
निदान तसा प्रयत्न करीन

पण हरणार नाही
नक्कीच नाही...

-अमृता


ज्या दादांनी मला देव समजवला, भक्ती समजवली, मनाचे, समाजाचे अनेक पदर उलगडून दाखवले, योग्य-अयोग्य याची जाण दिली, माझ्यातली मूल्य जागवली त्यांना ही कविता अर्पण.

Monday, 4 January 2016

मैत्र

अंधारून आलं आहे असं वाटंत असताना
स्वतःबद्दल मुळीच छान वाटत नसताना
अचानक
आजूबाजूचे काही चेहेरे ओळखीचे वाटायला लागतात
तुमच्या पावलांशी पावलं जुळवत सोबत चालायला लागतात
बघता बघता तुमच्या भावविश्वाचा भाग बनून जातात
आणि सोडवतात तुम्हाला तुम्ही स्वतःच घातलेल्या बेड्यांमधून
 
कोरडा पडत चाललेला
तो मनाचा सातवा पडदा
अचानक ओलावतो
सुखावतो
तरारून उठतो

मग लक्षात येतं
आजूबाजूला लख्ख उजाडलंय
पहाटेचे जादूई रंग
आभाळभर पसरलेत
आणि समोर
क्षितिजापर्यंत जाणारी
हिरवीगार वाट आहे

असं वाटतं
या सगळ्यांचे हात घट्ट धरावेत
हिरवाई छातीत भरून घेणारा एक मोठ्ठा श्वास घ्यावा
आणि धावत सुटावं

अनंतापर्यंत....

-अमृता

Tuesday, 24 November 2015

मुक्ती


अजून स्पंदत राहतोस
प्रत्येक नसेतून
प्रत्येक पेशीतून

खूप प्रयत्न केला
डोळ्यात साठवून घेतलेल्या तुला
स्वतःपासून वेगळं काढण्याचा
हो,
केला, अनेकदा
पण प्रत्येक वेळी
तुझ्याबरोबर माझी पण लक्तरं जायला निघायची 
श्रूंचे पाट वाहत
तुझ्या श्वासात अडकलेला
माझा श्वास पण
सोडून जायला बघायचा मला

शेवटी वेचला तुझा कण आणि कण
आणि घेतला सामावून पुन्हा स्वतःत
म्हटलं राहू देत
नाही जमायचं 
मग सवय करून घेतली
माझ्यातले तुझे ठोके ऐकायची
माझ्या ठोक्यांच्या अलिकडे पलिकडे

तुला माहितीये? 
असं म्हणतात
श्वासाच्या कूर्म नाडीला धरून
अलगद खाली गेलं
अगदी तिच्या तळाशी
की श्वासाची गाठ सोडवता येते
आणि मग
अलगद सोडता येतो
हा शरीराचा पिंजरा
जो नको नको म्हणत असतानाही
अनेक स्पर्श, अनेक गंध, श्वास
अशा पेशीभर आठवणी
फक्त साठवत राहतो
हावरटासारखा

मला पण आपल्या नात्याच्या त्या कूर्मेपर्यंत पोहोचायचंय
आणि मग
अलगद वेगळा काढायचाय तुझा श्वास
आणि मोकळं व्हायचं

कायमचं.....

-अमृता

Sunday, 20 September 2015

दरी



नकाच पडू माझ्या भानगडीत
चालू देत माझं आपलं
वेगळंच काहीतरी, भलतंच काहीतरी
तुम्हाला नाहीच कळणार
माझा आवाज तुमच्यापर्यंत नाहीच पोहोचणार
कारण आपल्यामधे एक दरी आहे
हां म्हणजे नातं आहेच, कचकड्याचं
तो डीएने पण आहे, ते जीन्स पण
पण या सगळ्याला व्यापून उरणारी
एक भली थोरली दरी आहे आपल्यात
या दरीत ते शेतकरी आहेत
ज्यांच्या विषयी तुम्हाला जराही कणव नाही
कारण ते टॅक्स भरत नाहीत
’ती लोकं’ आहेत फॅंड्रीमधली
ज्यांची तुम्हाला किळस वाटते
ती आदिवासी लोकं पण आहेत
विकासाच्या मार्गातले धोंडे बनलेली
आणि ती विस्थापित लोकं पण
ती नाही का सिग्नल्स वर दिसतात
त्यांचे घाणेरडे हात आपल्याला, आपल्या गाडीला लावत भीक मागतात
असं सगळं तुम्ही नाकारलेलं वास्तव या दरीत साचलंय
नदीत वाहून आलेल्या गाळासारखं
दिवसागणिक थरावर थर साचताहेत
घट्ट होत जाताहेत
भीतीदायक आहे सगळं
प्रलय येऊन पुनश्च सृजनाची सुरुवात असलेला
पिंपळाच्या पानावरचा तो बाळकृष्ण दिसेपर्यंत तरी
हे असंच चालणार
हा असाच अंधार असणार
गिळायला बघणारा
नकाच येऊ तुम्ही इथे
तुमचं चालू देत
हिंजेवाडी, मगरपट्टा, खराडी
ट्रॅफिक
पाचगणी की गोवा
टकीला की ओल्ड मॉंक
चिकन साटे की चिकन फलाणा
मी येते ना तुमच्याबरोबर
छान तयार होऊन
’व्यवस्थित’ कपडे घालून
माझा नेहमीचा मुखवटा घालून
डिनरला
मंगळागौरीची रांगोळी काढायला
साखरपुड्याला गणेशवंदना म्हणायला
गौरी जेवणाला
सगळ्याला
पण मनानी मात्र मी त्या दरीतच असते
नाही जमत मला तुमच्यासारखं
ते वास्तव नाकारत जगायला

-अमृता