Saturday, 24 September 2011

निसर्गाचं बी


निसर्गाचं बी
पेरायचंय मला माझ्या मनात
व्यापून टाकायचंय मन
पंचतत्वांनी

बनायचंय मला
निसर्गाचा आविष्कार
त्याचं नितळ रूप
आरसपानी

होऊ दे मनाला
कोवळ्या पालवीसारखं हिरवं
आकाशासारखं निळं, पाण्यासारखं तरल
उजळून जाऊ देत मन
कोवळ्या किरणांनी

बनू देत मनाला
पिंपळाचं पान, कोकिळेची तान
बहरून जाऊ देत मन
बहाव्याच्या फुलांनी

मनात उमटोत माझ्या
इंद्रधनूचे सप्तरंग
भरून जावो मनाचा आसमंत
जादुई सप्तसुरांनी

मग ते होईल असा आरसा
की देवीही थांबेल क्षणभर
तिचं रूप न्याहाळायला
कौतुकानी

No comments:

Post a Comment