आयुष्यातले काही क्षण....फक्त माझे!
काही क्षण, सगळ्या सगळ्यांपासून लपवून ठेवलेले...
काही क्षण, ज्यात इतर कोणाचाच वाटा नाही...
काही क्षण, ज्यावर इतर कोणाचाच हक्क नाही
असे काही क्षण, जेव्हा मी फक्त 'मी' असते
माझ्यावर इतर कोणाच्या डोळ्यांचा चष्मा नसतो
माझ्या माझ्याचकडून काही अपेक्षा नसतात
मी फक्त 'असते', आणि ते 'असणं' भरभरून घेत असते...माझ्यातच
असे काही क्षण, जे मला माझीच ओळख करून देतात... दरवेळी नवीन
असे काही क्षण, जे मला घेऊन जातात त्या दुसर्या दुनियेत...
जिथे एकही आरसा नसतो....मला माझे दोष दाखवायला...
जिथे एकही आरसा नसतो....मला माझे दोष दाखवायला...
जिथे असतो फक्त वारा....जो कुठून तरी येऊन माझ्या तोंडावर आपटतो, जो मी मनसोक्त पिते
जिथे असतो चंद्र, आणि त्याचं चांदणं असतं फक्त 'माझ्यासाठी', त्यात मनसोक्त डुंबायला
जिथे असतात दवबिंदू...माझे पाय भिजवण्यासाठी..
जिथे इतर कोणाच्याही पावलांची चाहूल नसते...
अगदी 'त्याच्याही'....हो! 'त्यालाही' ज्या क्षणांचा वाटेकरी होता येणार नाही असे काही क्षण
कारण शेवटी तो 'तो' आहे...आणि मी 'मी'
दोघं कितिही निःशब्द असलो, तरी शांतता बोलते...आणि 'त्या' क्षणी मला तेवढ्याही आवाजाचा त्रास होतो!
त्याचा माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणावर हक्क आहे...आत्ता पण तो आलाच ना?
पण त्यानी समजून घ्यावं...आणि हे माझे क्षण मला द्यावेत...जगायला!!
मी पण जाणार नाही... त्याच्या क्षणांवर हक्क सांगायला.... कारण ते फक्त 'त्याचे' असतील
असे काही क्षण, मी जगलिये....जगतिये...
बंद करून ठेवायचेत एका कुपीत
जे कोणालाच दिसणार नाहीत....
पण ज्याचा सुगंध मात्र वेडावत राहील...
मला....आणि माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना....
No comments:
Post a Comment