Wednesday, 16 September 2015

वादळ



एक सागर एक वादळ
भरकटलेली एक नाव
दूर कोठे केव्हा तरी
मागे राहिला एक गाव

एक गाव एक किनारा
एक घर माझे माझे
माणसं माझी नाती माझी
माती ओली माझी माझी

स्वप्न नवे क्षितिज नवे
पैल तीरी पैल तीरी
स्वप्न माती क्षितिज नाती
पिंगा पिंगा फेर धरी

क्षितिजापल्याड स्वप्नांसाठी
मागे सोडला एक गाव
इंद्रधनूच्या पायथ्यासाठी
जीवघेणी एक धाव

वादळ वारा स्वप्न पारा
भरकटलेली एक नाव
हरवलेला धृव तारा
नाही ठाव नाही ठाव

माझं जग माझी माणसं
दूर तेथे ऐल तीरी
स्वप्न माती क्षितिज नाती
पिंगा पिंगा फेर धरी


-अमृता

2 comments: